
अल्लीपूर : नजीकच्या कात्री येथे एक व्यक्ती घरीच मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीअंती पोलिसांनी तपासचक्र फिरविले असता, शंभर रुपयांच्या वादातून हत्या केल्याचे उघडकीस आले.
नंदकिशोर मंगल नान्ने (38) रा. काठी, असे मृताचे नाव आहे. त्याचा घरामध्ये मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु मृताचे वडील मंगल नान्ने यांनी नंदकिशोरला मारून त्याचा मृतदेह घरी पलंगावर आणून टाकल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता नंदकिशोरला दीपक उदयभान नान्ने याने शंभर रुपयाच्या वादातून ठार केल्याची धक्कादायक बाब पुढे आली. पोलिसांनी याप्रकरणी दीपकविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्याकरिता सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय रिटे, एस. चहांदे, अभय वानखेडे, त्र्यंबक मडावी हे त्याच्या घरी गेले असता तो फरार होता. तो नदीच्या पात्रात लपून असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस सहायक उपनिरीक्षक नितीन नलवडे करीत आहे.