गिरड : महसूल, वनविभाग आणि पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे. अंतरगाव येथील नाल्यातून अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पलटी होऊन एका मजुराला आपला जीव गमवावा लागला, ही घटना सोमवारी रात्री साडेबारा वाजता शक्करबाहुली बसस्थानकाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार अंतरगाव परिसरातील नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. येथून रात्रीच्यावेळी (एमएच ३२ एचए ४८६८) क्रमांकाच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळूची वाहतूक सुरू होती. या ट्रॅक्टरचा चालक व मालक यादव वानोडे असून रस्ता खराब असल्यामुळे वाळू भरलेला ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटी झाला, यात ट्ररॅक्टरमधील वाळूवर बसून असलेला मजूर संदीप गुडधे हा ट्रॅक्टरखाली दबल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गिरडचे ठाणेदार सुनील दहिभाते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिलीप पोले तपास करीत आहेत. प्रशासनाने ही चोरटी वाळू वाहतूक रोखण्याकरिता कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.