वर्धा : शेतक-यांना पारंपारीक पिकासोबतच फळे, फुले व मसाला लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान दिले जाते. विविध पिकांसाठी अनुदानाची टक्केवारी वेगवेगळी आहे. या योजनेंतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी देखील प्रोत्साहन दिले जाते. फळे, फुले व मसाला लागवडीसह आंबा, चिक्कू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन अभियानांतर्गत केले जाते.
विदेशी फळ पिक लागवडीसाठी ड्रॅगन फुट, अंजीर व किवी करीता 4 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेच्या 40 टक्के किंवा 1 लाख 60 हजार, स्ट्रॉबेरीसाठी 2 लाख 80 हजार प्रति हेक्टर खर्च मर्यादेच्या 40 टक्के किंवा 1 लाख 12 हजार व पॅशन फ्रुट, ब्लूबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडोसाठी 1 लाख प्रति हेक्टर खर्च मर्यादेच्या 40 टक्के अनुदान किंवा कमाल 40 हजार इतकी मदत दिली जाते. जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनांतर्गत आंबा, चिक्कू, संत्रा, मोंसबीसाठी 40 हजार प्रति हेक्टर मर्यादेच्या 50 टक्के अनुदान किंवा 20 हजार रुपये इतके कमाल अर्थसहाय्य दिले जाते. सन 2022-23 या वर्षात ड्रॅगनफुडसाठी साडेतीन हेक्टर लागवडीकरीता तसेच जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी 25 हेक्टर क्षेत्राकरीता अनुदान वितरीत करण्यात आले आहे. इच्छुक शेतकरी या अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करु शकतात.