वर्धा : शासकीय वृक्ष लागवडीचे ५० लाख रुपयांचे देयके मंजूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नारायणदास बुब यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी एक लाख रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवार (ता.६) वर्ध्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या चमुने आज सकाळी साडेअकरा वाजता ही कारवाई केली.
कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांनी बिल काढून देण्याकरिता फिर्यादी यांच्याकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. यातील १ लाख आज देण्याचे ठरले होते. आज बुब यांच्या शासकीय निवासस्थानी ही रक्कम स्वीकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने रंगेहात अटक केली. याचवेळी घेतलेल्या घर झडतीत बुब यांच्या घरातून सुमारे ६ लाख ४० हजारांची रोख जप्त केली. एसीबीचे देवराव खंडेराव, संतोष बावनकुळे, प्रदीप कुचणकर, प्रशांत वैद्य, प्रीतम इंगळे, प्रशांत मानमोडे यांनी ही कारवाई केली.