वर्धा : आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष व जागतिक महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ व नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने नव तेजस्विनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.विद्या मानकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत पाटील, माविमच्या जिल्हा समन्वयक अधिकारी संगिता भोंगाडे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक वैभव लहाने, केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ.जीवन कतोरे, शास्त्रज्ञ डॉ.धुमाळ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.कर्डिले यांनी वर्धा शहरात महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी व्यासपीठ व बाजारपेठ निर्माण होईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु महिलांनी प्रक्रिया व्यवसाय करुन त्यास आधुनिक यंत्र सामुग्रीची जोड द्यावी व उद्योग विकास साधावा, असे आवाहन केले.
मेळाव्यात स्वयंम सहायता बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे व मालाचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चार दिवशीय मेळाव्या दरम्यान अंधश्रध्दा या विषयावर गजेंद्र सुरकार यांनी भोंदू बाबा यांच्याकडून भोळ्याभाबड्या महिलांवर कश्याप्रकारे अत्याचार होतात यावर प्रात्याक्षिकाव्दारे जाणीव जागृती केली. तर तृणधान्याच्या पौष्टिक आहाराविषयी डॉ.धुमाळ यांनी महत्व सांगितले.