वर्धा : शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना आहे. त्याच पार्श्वभूमीवर गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली, पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत तपासणी केली असता त्याच्याकडून ८९५ ग्रॅम वजनाचा १७ हजार ९०० रुपयांचा गांजा जप्त केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून दुचाकीसह मोबाईल असा एकूण ८७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शेख अजिज ऊर्फ अजय शेख शाहिद (२७) रा. तारफैल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, एक व्यकती दुचाकीने गांजाची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तारफैल परिसरात सापळा रचून आरोपी अजिज ऊर्फ अजय हा एम.एच. ३२ एडी. ९७९४ क्रमांकाच्या दुचाकीने येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्याकडे असलेल्या प्लास्टिक पिशवीची पाहणी केली असता पिशवीत मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ८७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत बेड्या ठोकून आरोपी विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला, ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक आर. बी. खोत, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, नितीन इटकरे यांनी केली.