वर्धा : भारतीय चलनाच्या बनावट नोटा चलनात आणणार्या चार तरुणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या असून आरोपींना न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून ९४ हजारांच्या १८८ बनावट नोटा जप्त करन्यात आल्या. नोटा दिल्ली येथून वर्धेत आणल्याचे सांगण्यात आले.
१६ मार्च रोजी काही इसम गिताई मंदीर, गोपूरी येथे बनावट चलनी नोटांची विक्री करण्याकरिता येत आहे, अशी माहीती पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांना मिळाली. त्यांनी क्राईम इंटलिजंट युनिट, वर्धा शहर पोलीस यांचे संयुक्त पथक तयार करून आरोपी निखील अश्वीनराव लोणारे (२५) रा. श्रीराम कॉलनी, बोरगाव (मेघे), वर्धा हा एमएच ३२ एए ०६३९ क्रमांकाच्या दुचाकीने येताच पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये भारतीय चलनाच्या ५०० रुपये किंमतीच्या ९४ नग बनावट नोटा मिळून आल्या. ९४ बनावट नोटांमधील ५० नोटांवर ३ एचजी ८७९७३५ क्रमांक असून उवंरीत ४४ नोटांवर ३ एचजी ८७९७३७ असा नंबर आहे. स्वप्नील किशोर उमाटे (२४) रा. पवनार, प्रितम प्रदीप हिवरे (२३) रा. पवनार, साहील नवनीत साखरकर (२३) रा. पवनार यांच्यासह दिल्ली येथे गेलो होतो. तेथून या नोटा आणल्या असल्याचे सांगितले.
आरोपी निखील लोणारे याचे श्रीराम कॉलनी, बोरगाव (मेघे), वर्धा याचे घरून आरोपी स्वप्नील किशोर उमाटे, प्रितम प्रदीप हिवरे, साहील नवनीत साखरकर यांना ताब्यात घेतले. आरोपी स्वप्नील उमाटे याचेकडून ३ एचजी ८७९७४४३ क्रमांक असलेल्या ४८ नग बनावट नोटा, आरोपी प्रितम हिवरे याचेकडून ३ एचजी ८७९७४५ क्रमांक असलेल्या ४६ नग बनावट नोटा मिळून आल्या. चारही आरोपीतांनी संगणमत करून दिल्ली येथून १ लाख २० हजार रुपयांच्या बनावटी नोटा वर्धेत आणल्या. त्यापैकी २६ हजार रुपयांच्या बनावटी नोटा वेगवेगळ्या ठीकाणी चलनात वितरीत केल्या असल्याचे सांगितले. आरोपी तरुणांकडून ९४ हजारांच्या पाचशे रुपयांच्या १८८ बनावट नोटा, ४५ हजार रुपये किमतीचे चार मोबाइल, ३० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकुण १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अबुराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशानुसार क्राईम इंटेलिजंट युनिटचे कापडे व शहर ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.