वर्धा पंचायत समितीचे तालुक्यात करवसुली महाअभियान

वर्धा : वर्धा समिती समितीच्या माध्यमातून तालुक्यात ग्रामपंचायतीच्या करवसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीची करवसुली करण्यात येणार असून बुधवार दि.15 मार्च रोजी एकाच दिवशी करवसुली महाअभियान राबविले जाणार असल्याची माहिती गट विकास अधिकारी शशिकांत अर्जुन शिंदे यांनी दिली.

तालुक्यात चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत 60 टक्के करवसुली झाली असुन माहे मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के करवसुली पुर्ण करण्याकरिता अभियान राबविण्यात येणार आहे. करवसुली करिता विविध विभागाशी समन्वय साधुन वसुली अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शंभर टक्के करवसुली करिता ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी कंबर कसली असुन करवसुली मोहिमे दरम्यान तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीमध्ये थकीत करवसुली बरोबरच प्रलंबित करबाकी, वादग्रस्त प्रकरणे यांचाही निपटारा करण्यात येणार आहे. तसेच थकीत प्रत्येक खातेदारांच्या घरापर्यंत ग्रामपंचायत करवसुलीची धडक मोहित राबविण्यात येणार आहे.

या करवसुली अभियानाची ग्रामपंचायत स्तरावरुन प्रचार व प्रसिध्दी करण्यात येत असून जप्ती व नळ कनेक्शन तोडण्याबाबत संबंधितांना नोटीस देण्यात येणार आहे. तालुक्यातील विविध संस्था, महिला बचतगट, सेवाभावी संस्था, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहभागातून शंभर टक्के करवसुली करण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच प्रत्यक्ष खातेदारांनी स्वत: कराचा भरणा करुन सहकार्य करण्याचे आवाहन वर्धा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here