वर्धा : व्याजाचे पैसे का देत नाही, या कारणावरून तीन जणांनी 55 वर्षीय व्यक्तींवर हल्ला करून जखमी केले. त्यानंतर व्यक्तीची दुचाकी तोडून नुकसान केले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांडगाव येथे घडली. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्राप्त माहितीनुसार, मोरेश्वर बळीराम पाहुणे (वय 54) रा. मांडगाव यांनी आरोपी चंदनखेडे याच्याकडून 15 हजार रुपये उसने घेतले होते. 7 मार्च रोजी मारेश्वर पाहुणे हे पांडुरंग झाडे यांच्या घरासमोर मित्र क्रिष्णा वैद्य व हरीदास पाहुणे यांच्यासोबत बोलत होते. दरम्यान, गावातील आरोपी प्रभाकर चंदनखेडे, रवी चंदनखेडे, भूषण चंदनखेडे हे तिन्ही हातात काठी घेऊन आले. व्याजाचे पैसे का देत नाही, या कारणावरून शिवीगाळ करून वाद घातला. मोरेश्वर पाहुणे यांनी आरोपीस व्याजाचे पैसे पूर्ण दिले आहे, असे म्हटले. दरम्यान, आरोपी रवी चंदनखेडे याने पाहुणे यांच्या डाव्या कानावर काठीने मारहाण केली. आरोपी भूषण चंदनखेडे याने दुचाकी फोडून 5 हजारांचे नुकसान केले. त्यानंतर मोरेश्वर पाहुणे हे गाडी उचलण्यास गेले असता आरोपी प्रभाकर चंदनखेडे याने काठीने पाठीवर काठीने मारहाण केली.