वर्धा : एकाच भूखंडाची दोघांना विक्री करून महिलेचा विश्वासघात करीत तब्बल ८ लाख ९ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बोरगाव मेघे परिसरात उघडकीस आला, याप्रकरणी २८ रोजी महिलेने शहर पोलिसात तक्रार दाखल केली.
पनादेवी बलदीर राय (५६), रा. बोरगाव यांना घर बांधकामासाठी भूखंडाची आवश्यकता असल्याने त्या भूखंडाच्या शोधात होत्या. त्यांना बोरगाव मेघे येथील शेत सर्व्हे न. १०२ नवीन व जुना ११० मधील भूखंड न. १२ हा त्यांना आवडल्याने खरेदी करण्याचे त्यांनी ठरविले. हा भूखंड त्यांनी अरुणा दुर्गेश शुक्ला हिच्याकडून २५ मे २०२२ रोजी रजिस्टर विक्रीपत्रान्वये खरेदी केला. त्यानंतर पनादेवी यांनी भूखंडाचा फेरफार घेण्यासाठी अर्ज केला असता त्यांना मिळालेल्या सात बाऱ्यावर सुमित ठाकूरदास साहू यांच्या नावाची मालक म्हणून नोंद असल्याचे समजले. फेरफार पंजीची प्रत काढली असता सदर भूखंड सुमित साहू याने ६ मे २०१३ रोजी ४ लाख ९९ हजार ५०० रुपयांत अरुणा शुक्ला यांच्याकडून खरेदी केल्याचे समजले. ही बाब अरुणा शुक्ला यांनी लपवून ठेवत एकच भूखंड दुसऱ्याला विकून पनादेवी यांची ८ लाख ९ हजारांनी फसवणूक करीत पैसे हडप केल्याची तक्रार त्यांनी दिली.