देवळी : शहरात मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून कारसह देशी व विदेशी असा सात लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपीने पलायन केले. ही कारवाई शुक्रवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अंदोरी नदीच्या टी पॉईंटवर देवळी पोलिसांकडून करण्यात आली.
वर्धा नदीचे पात्र ओलांडून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अंदोरी ते बोपापूर वाणी दरम्यान टी पॉइंटवर सापळा रचला होता. भरधाव कार येताना दिसली. मात्र, पोलिसांना समोर पाहून चालकाने रस्त्यातच गाडी उभी करून अंधारात पलायन केले. पोलिसांनी चालकाचा पाठलाग केला. पण, तो कुठेही मिळून आला नाही. त्यामुळे चालकाचा आणि दारू व्यवसाय करणाऱ्या मालकाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी कार (क्र. एमएच ०२ बीआर १०९९)सह दारूसाठा व मोबाइल असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक तिरुपती राणे, मनोज, धनंजय किटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.