आर्वी : देऊरवाड्याकडून भरधाव आर्वीकडे जाणाऱ्या कारचालकाने निष्काळजीपणे कार चालवून दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना अमरावती येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. हा अपघात कर्माबादा फाट्याजवळ ४ रोजी रात्री ९.१७ वाजताच्या सुमारास झाला. स्वप्निल पाटील असे मृतकाचे नाव आहे. तर भूषण गोडवे आणि अन्य एक सर्व रा. आर्वी या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्वी ते देउरवाडा रस्त्यावर एक दुचाकी थांबली होती. त्या दुचाकीजवळ दोन युवक उभे होते. त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने ते थांबले होते. काही वेळाने दुसऱ्या दुचाकीवरील दोघे बाटलीत पेट्रोल घेऊन आले. दरम्यान, देऊरवाड्याकडून एम.एच. २७ बीझेड ८८९१ क्रमांकाची कार भरधाव आली आणि दोन्ही दुचाकींना चिरडून गेली. काही दूर अंतरावर दोन्ही दुचाकी घासत गेल्या. यात दोन युवक गंभीर जखमी झाले, तर एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती आर्वी पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळ गाठून जखमींना रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.