वर्धा : शहरातील गुन्हेगारी घटना कमी नाव घेत नाही. दररोज चाकूचे सूरे निघत आहेत. किरकोळ कारणावरून एका फळ विक्रेत्याला बेदम मारहाण करण्यात आली. यासोबत मोबाइलसुद्धा फोडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थनगर येथील इम्रान खान युनूसखान पठाण (वय 32) हे फळविक्रीचा व्यवसाय करतात. ते नेहमीप्रमाणे 25 रोजी रात्री दुकान बंद करून रवींद्र यादव यांना घरी
सोडविण्यासाठी गेले होते.
स्टेशनफैल येथे जात असताना रेल्वे गेटजवळ थांबले. त्यांचा नोकर रवींद्र परिसरात उभ्या असलेल्या चंदू मिश्रा यांच्याशी बोलण्यासाठी गेला होता. रवींद्रने आदिलची विचारपूस केली, यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. एवढेच नाही तर त्यांनी रवींद्रला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून रवींद्रने जीव वाचवून पळ काढला. परंतु, चंदू आणि त्याच्या दोन साथीदारांनी इम्रानला पकडले. टिफीनच्या डब्याने हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात इम्रान गंभीर जखमी झाला. एवढेच नाही तर त्याचा मोबाईल हिसकावून तो फोडला. कसातरी इम्रान यांनी तावडीतून सुटका केली. दरम्यान खिशातील 5 ते 6 हजार रुपयेही पडले. कसा तरी तो त्याचा मित्र शेख आसिफ याच्या घरी पोहोचला. तेथून त्याने त्याचा भाऊ सलमानला फोन करून सरकारी दवाखान्यात नेले. याप्रकरणी शहर पोलिस चंदू मिश्रा आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.