गुन्हेगारांच्या मुस्क्या आवरणार! सर्वसामान्यांना न्याय देणार; पोलीस अधीक्षक नुरूल हसन: पत्रकारांशी साधला संवाद

वर्धा : न्याय मिळण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी माझे दार सदैव उघडे आहेत. ही खुर्ची कोणतीही व्यक्‍ती, जात, धर्म आणि राजकीय पुढाऱ्यांशी कधीही ‘मॅनेज’ होणार नाही. मी शेतकरी कुटुंबातील असल्याने मला सर्वसामान्यांच्या समस्यांची जाणीव आहे. मला नागरिकांचा सेवक बनून काम करायचे आहे. नागरिकांची सुरक्षा करणे आणि शांतता व सुव्यवस्था राखणे, हाच माझा एकमेव उद्देश आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भेटी दरम्यान दिली.

पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. मंगळवारी २४ रोजी पोलीस अधीक्षकांच्या दालनात भेटीदरम्यान ते बोलत होते. नुरुल हसन पुढे म्हणाले की, वर्धा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, अवैध व्यवसायांवर अंकुश लावणे, गांजा, दारूविक्री, अवैध वाळू वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक समस्या निकाली काढणे याला प्राथमिकता देण्यात येणार आहे. काम करत असताना मी देखील तुमच्यातलाच एक आहे, असा विश्‍वास नागरिकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ज्याच्यासोबत कुणी नाही त्याच्या पाठीशी एसपी उभा आहे, कोणत्याही दबावाखाली काम करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन

पोलीस अधीक्षक नरुल हसन यांच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत त्यांनी कोणताही अवैध व्यवसाय १०० टक्क्ते बंद होणार नाही. पण, ते करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यामुळे अवध व्यवसाय करणार्‍यांनी आपले व्यवसाय बंद करावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here