वर्धा : कोरोनात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना सरकारने ५० हजार रुपये अनुदान देत मदत देण्यात आली. संबंधितांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली. मात्र, मृतांच्या आकडेवारीपेक्षा चार पटीने रक्कम वाटण्यात आली. मात्र, चूक लक्षात येताच शासकीय निधी परत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत १६ जणांनी ६ लाख रुपयांचा निधी शासनाला परत केला आहे. अशी एकूण ४६ कुटुंब आहेत. उर्वरित कुटुंबीयांनी अद्याप २३ लाख रुपयांचा निधी परत केला नसल्याची माहिती आहे.
राज्य सरकारने वर्धा जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने आर्थिक लाभ घेतलेल्या कुटुंबीयांना शासकीय निधी परत करण्याचे आवाहन केले होते. मात्र, ४६पैकी केवळ १६ कुटुंबीयांनीच ही रक्कम परत केली आहे. कोविडमध्ये मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागत होता. यासाठी जिल्हास्तरावर केंद्रही स्थापन करण्यात आली होती. परंतु, काही प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या एकाहून अधिक नातेवाईकांनी अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केले होते. यामध्ये २३ जणांनी दोनदा अर्ज केले, ४ जणांनी तीनदा आणि चार वेळा अर्ज केला. अशा अर्जदारांची संख्या केवळ १ असल्याने त्या लोकांच्या बँक खात्यात दोनदा पैसे जमा करण्यात आले.
मात्र, ही बाब निदर्शनास देताच प्रशासनाची धावपळ उडाली आणि संबंधितांना नोटीस बजावून शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याचे सांगून रक्कम परतमागितली. प्रशासनाच्या आवाहना वर१६ जणांनी ६ लाख रुपये प्रशासनाला परत केले. परंतु अशी ४६ कुटुंबे आहेत की, ज्यांनी आतापर्यंत रक्कम परत केलेली नाही. त्यांच्याकडून २३ लाख रुपये वसूल करायचे आहेत. अशांनी दिलेल्या मुदतीत रक्कम परत केलेली नसल्याने प्रशासनाकडून योग्य कार्यवाही केली जाणार आहे.