

आष्टी शहीद : आष्टी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणाच्या काठावर नागमंदिर परिसरात अमरावती जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची हत्या करून मौजा होशंगाबाद जंगलातील झुडपात मृतदेह फेकून दिला. सदर व्यावसायिकाच्या हत्येचे गूढ कायम असून, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
आष्टीपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या आष्टी मोर्शी रोडवर नागमंदिर सिंबोरा धरणाचे बाजूला जंगल परिसरात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मृतक अब्दुल वहाब अब्दुल सत्तार (45) रा. अंबाडा, ता. मोर्शी, जिल्हा अमरावती यांची अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतकाला झुडपात फेकून आरोपींनी पळ काढला, मृतकाला अज्ञात आरोपीने मोशीवरून एखाद्या वाहनात आणले असावे आणि घटनास्थळ परिसरात त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला असावा. त्यात ते गंभीर जखमी होऊन मरण पावले असावे, असा संशय पोलिसांना आहे. आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट झुडपात लावून आरोपी पसार झाले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास ठाणेदार लोकरे यांनी घटनास्थळ गाठून शोधाशोध सुरू केली असता एका झुडपात अब्दुल वाहिद अब्दुल सत्तार यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याची ओळख पटवण्यातकरिता नातेवाईकांना बोलावण्यात आले.
या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी आवीं गोकुळसिंह पाटील, पोलिस निरीक्षक गायकवाड, एलसीबी सपोनि इंगळे, ठाणेदार लक्ष्मण लोकरे, पीएसआय अनिल देस्कर पीएसआय देवानंद केकन, देरकर, बाबासाहेब गवळी, निखील वाणे, शेख नबी, राहुल तेलंग, नदीम खान, संजय राठोड आदी उपस्थित होते. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, आर्वी येथे पाठवण्यात आला. याप्रकरणी फिर्यादी मोहम्मद शोयब अब्दुल वहाब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत.