देवळी : जुन्या वादाचा वचपा काढण्याकरिता दोघांनी एका युवकावर चाकू हल्ला करून त्याला जागीच ठार केले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजतादरम्यान यवतमाळ मार्गावरील खासगी आयटीआयसमोर घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली, शहरामध्ये गेल्या आठवड्यापासून लागोपाठ घडत असलेल्या तलवार व चाकू हल्ल्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे. पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील ही तिसरी हत्या आहे. आता ही गुंडागर्दी रोखण्याचे पोलिसांपुढेही आव्हान आहे.
दुर्गेश राधेश्याम शेंडे (२२) रा. केदार ले-आऊट असे मृताचे नाव आहे. याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वैभव रामभाऊ दुरगुडे (२६) व शुभम नारायण मातकर (२५) दोन्ही रा. देवळी या दोघांनाही अटक केली. मृत दुर्गेश शेंडे हा गोंदिया येथील रहिवासी असून मागील पंधरा वर्षांपासून देवळीत राहतो. तो येथील औद्योगिक वसाहतीत त्याचा चहा कॅन्टीन चालवायचा. यातील दोन्ही आरोपीसोबत त्याचे मित्रत्वाचे संबंध होते. दरम्यान, शुक्रवारच्या सायंकाळी जुन्या वादातून आरोपींचा मृतासोबत भांडण झाले होते. शिवाय शनिवारच्या सायंकाळी साडेसात वाजताच्यादरम्यान यातील आरोपींनी मृताला लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. त्यामुळे मृतक शेंडे याच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची ही कारवाई रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चालल्यानंतर यातील मृत शेंडे हा घराकडे परत जात होता. यादरम्यान त्याचा आरोपींसोबत पुन्हा वाद झाला आहे. या वादात आरोपींनी मृत शेंडे याच्या छातीत चाकूने खोलवर वार केले. हे वार वर्मी लागून फुफ्फुस डॅमेज झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे. शहरात अवैध दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. किराणा दुकानासारखी जागोजागी दारूची दुकाने उघडली आहेत. हा सर्व गोरखधंदा पोलिसांच्या मर्जीतून होत असल्याची टीका होत आहे. देवळीत गुन्ह्याचे प्रमाण वाढण्यासाठी हेच कारण असल्याने वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.