शेतकऱ्याने शासनाकडे मागितली आत्महत्या करण्याची परवानगी! नुकसान झाले मोठे, मदत मिळाली अल्प

वर्धा : लगतच्या कोपरा व वघाळा परिसरातील नाल्यालगत असलेल्या शेतामध्ये नाल्याच्या पुराचे पाणी शिरले. या पुरामुळे शेतातील सर्व पिके खरडून गेल्याने शेतकऱ्याला शासनाने जाहीर केलल्या मदतीनुसार नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते. पण, नुकसान मोठे असतानाही अल्प मदत मिळाल्याने शेतकरी पिता-पुत्रांनी खंत व्यक्‍त करीत दिलेली मदत परत घ्या आणि आम्हास आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

कोपरा (चाणकी) येथील संदेश राऊत व त्यांचे वडील वसंता राऊत यांची मौजा कोपरा व वघाळा शिवारात शेती आहे. या शेतालगतच्या नाल्याला पूर आल्याने त्यांच्या शेतातील पिके खरडून गेली. पिकांचे पूर्णत: नुकसान झाले तरीही संदेश राऊत यांच्या खात्यात ६ हजार रुपये, तर वसंता राऊत यांच्या खात्यात ७ हजार रुपयेच जमा झाले आहेत. दोघांच्याही नावे एक हेक्टरपेक्षा अधिक शेती आहे. शासनाने १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर मदत देण्याचे जाहीर केले असतानाही इतकी तुटपुंजी मदत मिळाल्याने शेतकरी पिता-पुत्रांना धक्काच बसला. ही मदत योग्य नसून, आम्ही शासनास परत करीत आहोत. आम्हाला शासनाने आत्महत्येची परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here