वर्धा : राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावरील सेवा पंधरवड्याच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्यात आले होते. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावर व आमदार दादाराव केचे यांची उपस्थिती होती.
अन्यायकारक एनपीएस योजना तात्काळ रद्द करून राजस्थान, छत्तीसगड व झारखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्थन योजना लागू करावी, अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेचे सचिव प्रमोद खोडे यांच्या नेतृत्वात निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना उपाध्यक्ष मंगेश भोमले, नितीन खरावे, अश्विनी इंगोले, सीमा खेडकर, गणेश राठोड, आशिष पाटील, सचिन खोडे, गजानन माहुरे, सुरेंद्र दीक्षित तसेच जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.