

वर्धा : अनुसुचित जाती तथा नवबौध्द घटकातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दि.3 ऑक्टोबर पासुन अर्जाचे वितरण सुरु करण्यात येणार आहे. दि.15 नोव्हेंबर पर्यंत प्राप्त झालेले परिपूर्ण अर्ज स्विकारण्यात येणार आहे. सदर योजनेसाठी कनिष्ट व वरीष्ठ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तथा शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसुचित जाती, नवबौध्द घटकातील विद्यार्थी पात्र राहतील. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे समाज कल्याण विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.