वर्धा : भुगाव येथील उत्तम गालवा कंपनीत पवनार येथील सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरी मिळावी, याकरीता वारंवार अर्ज, विनंती करण्यात आली. मात्र कंपनीकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. पवनार-वरुड मार्गे या कंपनीची पाइपलाईन टाकण्यात येत आहे. हे काम तात्काळ थांबविण्यात यावे, असा प्रस्ताव माजी सरपंच अजय गांडोळे यांनी ग्रामपंचायतीच्या मंगळवार (ता. ३०) झालेल्या आमसभेत मांडला होता. हा ठराव एकमताने मंजुर करण्यात आला.
उत्तम गालवा कंपनी, भुगांव या कंपनीची स्थापना झाली तेव्हापासून पवनार गावातील धाम नदी पात्रातून पाण्याचा उपसा करीत आहे. पवनार येथे त्यांचा पंपहाऊस व पाइपलाइनसुद्धा गेलेली आहे. गेल्या ३० वर्षांच्या कार्यकाळात कंपनीने पवनार येथील बेरोजगार तरुण व गावकरी यांना प्राधान्यपणे कुठल्याही प्रकारच्या नोकरीत समावून घेतले नाही. कुठल्याही प्रकराचा कंपनीचा सीएसआर फंडातून गावांमध्ये कठलेही विकास काम केले नाही.
याबाबत वारंवार कंपनीला निवेदन दिले तरी कंपनी पवनार येथील बेरोजगार तरुण व गावकऱ्यांना नोकरी देण्यात उत्सुक नाही. सद्यास्थितीमध्ये पवनार-वरुड रोड त्यांची मार्गाने कंपनीचे नवीन पाइपलाइन टाण्यास सुरुवात केली आहे. कंपनी जोपर्यंत स्थानिक रोजगार तरूण व गावकरी यांना प्राधान्यक्रमे नोकरी देण्यास व फंडातून गाव विकासाची कामे करण्यास लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची परवानगी देवू नये असेही या ठरावात मंजुर करण्यात आले आहे.