कारंजा (घा) : येथील महामार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम मागील पाच महिन्यापासून रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांची वर्दळ आणि संभाव्य धोके लक्षात घेता उड्डाणपुलाचे रखडलेले बांधकाम ताबडतोब पूर्ण करावे या मागणीचे निवेदन कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने तहसीलदार कारंजा यांचे मार्फत महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे.
शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ गेलेला आहे मागील दीड-दोन वर्षापासून येथे जांडू कंट्रक्शन कंपनी द्वारा उड्डाणपुलाचे काम चालू होते. १० मार्चपासून अचानकपणे या पुलाचे बांधकाम बंद झालेले आहे. पर्यावरण विभागाच्या उत्खनन विभागाच्या परवानगीच्या नवीन निकषामुळे मुरमा अभावी या पुलाच्या भराईचे काम थांबलेले आहे असे जांडू कंट्रक्शन कंपनीद्वारा सांगण्यात येत आहे. उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक ही सर्विस रोडने वळती करण्यात आली आहे. मात्र सर्विस रोड अरुंद असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी होते, अपघाताची शक्यता वाढली आहे. सदर बांधकाम हे शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी आहे, बाजूला बस स्थानक व दोन्ही बाजूने मुख्य मार्केटचा परिसर आहे, उड्डाणपुलाच्या बांधकामाला लागूनच नागरी वस्ती, तहसील कार्यालय, दिवाणी न्यायालय, शाळा, महाविद्यालय आहे. त्यामुळे येथे रस्ता ओलांडणाऱ्यांची दिवसभर प्रचंड गर्दी वर्दळ असते.
विद्यार्थ्यांसह नागरिकांना सर्विस रोड ने जाणे येणे करावे लागते आणि त्यात सर्विस रोडने महामार्गाची मोठी वाहने सुद्धा जातात त्यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे आता पावसामुळे सर्विस रोडवर माती चिखल व पाणी त्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रोड क्रॉस करावा लागतो, व सर्विस रोड ने जावे लागते. सदर समस्येचा विचार करता व अपघाताची संभाव्यता लक्षात घेता सदर उड्डाणपुलाचे रखडलेले बांधकाम ताबडतोब पूर्ण करावे. समृद्धी महामार्गाचे काम थांबलेले नाही पण आमच्या शहरातील उड्डाणपूलाचे काम का थांबले? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सदर मागणीचे निवेदन कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. व निवेदनाच्या प्रतीलीपी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रामदास तडस, स्थानिक आमदार दादाराव केचे, व्यवस्थापक राजमार्ग परियोजना कार्यान्वयन शाखा अमरावती व व्यवस्थापक जांडु कंट्रक्शन प्रा. लि. कंपनी यांना पाठविले आहेत. निवेदन देते वेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.