वर्धा : विदेशी बँकेत वडिलांनी ठेवलेले पैसे मिळवून देण्याचे आमिष देत महिलेला चक्क ४.६६ लाखांनी गंडा घालण्यात आल्याची घटना तक्रारीनंतर उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावंगी पोलिसांत तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, सारिका मून यांना रिचर्डटायसन नामक व्यक्तीच्या नावाने मेल आला. त्यात महिलेच्या वडिलांच्या नावाने फिलिपाईन देशातील स्टेरलिंग बॅक ऑफ आशिया नावाच्या बँकेत 3.8 मिलियन यूएसटी (डॉलर) रक्कम असल्याचे तसेच नॉमिनी म्हणून सारिका यांचे नाव असल्याचे सांगण्यात आले. ती रक्कम खात्यात. जमा करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगितल्यावर सारिका यांनीही त्यावर विश्वास ठेवला. आरोपीकडून सांगण्यात आलेल्या सर्व प्रक्रिया सारिका यांनी केल्यावर सारिकाच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ६६ हजार ७४८ रुपयांची कपात झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सारिका यांनी सावंगी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.