

वर्धा : देवळी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश तहसिल प्रशासनाला दिले. यावेळी त्यांच्यासोबत देवळी तहसिलदार राजेश सरवदे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवळीचे उपकार्यकारी अभियंता, निवासी नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.
देवळी तालुक्यातून यशोदा नदी व वर्धा नदी वाहत असुन बरेच क्षेत्र दोन्ही नदीच्या पुरामुळे बाधित झाले. पुराने बाधित झालेल्या डिगडोह ते नांदोरा येथील पुल, जामनी येसगाव येथील बंधा-यावरील पुल, सोनेगाव, वायगाव ते बोरगाव येथील पुल, शेकापूर, दिघी-बोपापूर व कवठा-चिटकी येथील असे 9 पुल पावसामुळे खचलेले असल्यामुळे सदर पुलावरील वाहतुक बाधित झालेली असल्याचे तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना सांगितले.
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी नांदोरा (ड) व कोळोना चोरे येथील पुलास भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागास सदर पुलाची तात्पुरती दुरस्ती करुन पुल वाहतुकीस पुर्ववत सुरु करण्याच्या सूचना दिल्या.