सायली आदमने
पवनार : येथील धाम नदी परिसरात फिरायला आलेल्या युवकांनी याच परिसरात मद्य प्राशन करुन नदीपात्रात आंघोळीकरीता उतरले असता पाण्याच्या तेज प्रवाहात वाहत गेला. नदीपात्राच्या मधोमध येका खडकाला तो पकडून होता. याची माहिती मिळताच प्रशासनाची टीम आणि गावातील पोहण्यात पटाईत असलेल्या युवकांनी नदीपात्रातील पाण्यात उड्या घेत त्याला सुखरुप बाहेर काढले. सुमारे दोन तास हा थरार परिसरातील पर्यटकांनी अनुभवला. ही घटना शुक्रवार (ता. १५) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. अनुराग गडकरी वय १९ वर्षे रा. झडशी असे वाचविण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
घटणेची माहिती मिळताच येथील ग्रामविकास अधिकारी श्री डमाळे त्यांनी लगेच सेवाग्राम पोलीसस्टेशन व तहसीलदार वर्धा यांनी माहिती देऊन पवनार येथील पट्टीचे पोहणारे अर्जुन सातघरे, दीपक सातघरे, दशरथ हजारे, भगीरथ जोगे यांना पाचारण केले. त्या दरम्यान सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश ब्राह्मणे, आपल्या टीम सह व तहसीलदार कोळपे हे सुद्धा लाईफ जॅकेट व दोरखंड घेऊन घटनास्थळी दाखल झाले. अर्जुन सातघरे व त्याचे सहकार्याने पोहत जाऊन त्या युवकाला गाठले व त्याला लाईफ जॅकेट व दोरखंडचे मदतीने आधार देत सुरक्षित तीरावर आणल्याने युवकाचे प्राण वाचले. प्रशासन व स्थानिकांनी तत्परता दाखविल्याने युवकाचे प्राण वाचू शकले. यावेळी मंडळ अधिकारी देशमुख, तलाठी सहारे, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, कर्मचारी यांची या प्रसंगी मोठी मदत झाली. यावेळी पोलिस कर्मचारी प्रकाश लसुनते, निलेश नेहारे, प्रभाकर उईके, सैनिक सानू मुंगले, सुरज वैद्य, राहुल साठोणे, गणेश मसराम, देविदास गुरनूले, राजेन्द्र उराडे यांनी मदतकार्यात सहकार्य केले. यावेळी छत्री परिसरात फिरायला आलेल्यांची घटना स्थळी बघ्यांची मोठी गर्दी होती.