वर्धा : इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी २१ जून रोजी सुधारित शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला असून, या योजनेमुळे अपघाती मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना दीड लाखाची शासकीय मदत मिळणार असल्याची माहिती शिक्षक नेते अजय भोयर यांनी दिली आहे.
या सुधारित योजनेंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास एक लाख रुपये, विद्यार्थ्याला अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास जास्तीत जास्त एक लाख रुपये, विद्यार्थी आजारी पडून, सर्पदेशाने किंवा पोहताना मृत्यू पावल्यास दीड लाख रुपये, विद्यार्थी खेळताना, आगीमुळे, विजेच्या धक्क्यामुळे, वीज अंगावर पडून जखमी झाल्यास एक लाखाची शासकीय मदत मिळणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी पालक, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांची राहणार आहे. प्रस्ताव निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यात एक समिती गठित करण्यात आली आहे. त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक,शिक्षणाधिकारी.जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य म्हणून तर शिक्षणाधिकारी हे सदस्य सचिव राहणार आहेत. असल्याचेही शिक्षक नेते अजय भोयर यांनी कळविले आहे.