वर्धा : पुलगाव शहरातील बालवाडी क्रमांक 133, शारदा महिला बचत गट पुलगाव यांच्या मार्फत मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारमध्ये अळ्या निघाल्याची तक्रार पुलगावातील प्रभाग क्र.2 व 3 मधील रहिवाशांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प व्यवस्थापकाकडे केली आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये असलेल्या बालवाडी क्र. 133 मधील मुलांकरिता आहार पुरविण्याचे कंत्राट येथील शारदा महिला बचतगटाला दिले आहे. बचतगटाकडून मुलांना पुरविण्यात येणाऱ्या आहारात अळ्या निघत असून, त्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा घटना वारंवार होत आहे. याची कोणीही दखल घेताना दिसत नाही.
महिला गटाला आहार पुरविण्याचा दिलेला कंत्राट रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शारदा महिला बचतगटाकडून पुरविण्यात येणाऱ्या अयोग्य आहारामुळे यापुढे कोणत्याही मुलांस कोणतीही इजा किंवा आरोग्याला धोका झाल्यास याची जबाबदारी आपली राहील असे निवेदनातून म्हटले आहे. निवेदनावर सरस्वती दुपारे, मिरा निनावे, भारती उरकुडे, अश्विन अरागडे, उषा दुपारे, आदिती लांडे, आतीश दुधारे, तबसूम यांच्यासह 18 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.