वर्धा : मागील २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह नाल्याला आलेल्या पुरात वाहून बाहेर आल्याने मृतदेह कुजलेल्या स्थितीत दिसून आला. वन्यप्राण्याने हल्ला करून नाल्यात फेकल्याचा अंदाज घरच्यांनी वर्तविला. ही घटना बेल्हारा जंगल शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी २० रोजी आर्वी पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. बाळकृष्ण फकीरचंद मनवर रा. धामकुंड रा. कारंजा असे मृताचे नाव आहे.
बाळकृष्ण मनवर हे ३० मे २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास शेतात गेले होते. मात्र, ते उशिरापर्यंत घरी न आल्याने याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती तेव्हापासून बाळकृष्ण बेपत्ताच होता. बाळकृष्णचा मुलगा नरेश हा घरी असताना त्याला बेलारा तांडा शिवारात असलेल्या जंगलातील नाल्यामध्ये वडील बाळकृष्णचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याची माहिती मिळाली. नरेशने घटनास्थळी जात मृतदेहाच्या अंगावरील कपड्यावरून ओळख पटविली, वडील शेतात असताना त्यांच्यावर वन्यप्राण्याने हल्ला करून त्यांना शेतापासून थोड्या दूर अंतरावर जंगलातील नाल्यात फेकून दिले असावे, दोन दिवसांपूर्वी नाल्याला आलेल्या पुरामुळे मृतदेह वाहून आल्याचे त्याने आर्वी पोलिसांना दिलेल्या बयाणात सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जात घटनास्थळाचा पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.