नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली! पत्नी ठार, पती गंभीर जखमी

हिंगणघाट : माहेरी गेलेल्या सुनेला आणण्यासाठी कारने जात असलेल्या सासूवर काळाने झडप घातली. भरधाव कार अनियंत्रित होत उलटल्याने सासरे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वडनेर-सिरसगाव मार्गावर येरणगाव शिवारात झाला. सुवर्णा काशेट्टीवार (६५) असे मृत सासूचे तर रमेश काशेट्टीवार असे गंभीर जखमी सासऱ्याचे आणि राहूल आडे असे कार चालकाचे नाव आहे.

हिंगणघाट येथील रिठे कॉलनी भागातील रहिवासी रमेश काशेट्टीवार व सुवर्णा काशेट्टीवार हे वृद्ध दाम्पत्य सून प्रज्ञा ही तिचे माहेर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे असल्याने तिला आणण्यासाठी एम. एच. ०२ बी. जी. ६०७८ क्रमांकाच्या कारने पुसदच्या दिशेने जात होते. भरधाव कार वडनेर येथून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या येरणगाव शिवारातील वळणावर आली असता कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन रस्त्याच्या कडेला जात उलटले. यात कारमधील सुवर्णा काशेट्टीवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश हे गंभीर जखमी झालेत. शिवाय कार चालक राहुल आडे रा. हिंगणघाट यालाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. घटनेची नोंद वडनेर पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here