मित्राचा वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करणे भोवले! २३ वर्षीय तरुणाला चाकूने भोसकले; जुन्या आरटीओ मैदानालगत मध्यरात्रीचा थरार: आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : मित्राचा वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करून त्याला केक भरवून रात्रीच्या सुमारास घराकडे जात असतानाच तीन दुचाकींवर आलेल्या सहा आरोपींनी अवघ्या २३ वर्षीय युवकाशी दुचाकीचा कट लागल्याच्या कारणातून झालेल्या क्षुल्लक वाद जिवावर बेतला असून, युवकाच्या पोटात चाकू भोसकून त्याचा कोथळाच बाहेर काढून निर्घृण हत्या केली.

ही घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास गोरसभंडार कॉलनीजवळ असलेल्या जुन्या आरटीओ मैदानालगतच्या रस्त्यावर घडली. अक्षय मनोज सोनटक्के (२३) रा. संत तुकाराम वॉर्ड रामनगर, असे मृतकाचे नाव असून पोलिसांनी ऋषिकेश दिनेश बहेणवाल (१८), नीलेश मनोहर पटेल (२९) यांना अटक करण्यात आली असून पाच अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. तसेच मुख्य आरोपी मयूर गिरी हा अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमोल तामगाडगे रा. हिंदनगर याचा वाढदिवस असल्याने मृतक अक्षय सोनटक्के आणि त्याचे काही मित्र हे दुचाकीने जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील मैदानात केक कापण्यासाठी गेले होते. अमोलने केक कापला असता सर्व मित्र त्याला केक भरवीत होते. दरम्यान मृतक अक्षय हा मैदानाबाहेर निघाला आणि दुचाकीने घरी जात असतानाच तुकडोजी मैदानाकडून आलेल्या तीन दुचाकी त्याच्याजवळ थांबल्या आणि दुचाकीला कट का मारला असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तेवढ्यातच मुख्य आरोपी मयूर गिरी रा. आनंदनगर याने जवळील चाकू काढून अक्षयच्या मांडीवर असलेल्या ओटीपोटात भोसकला असता मृतकाचा कोथळाच बाहेर काढला. ही बाब वाढदिवस साजरा करणाऱ्या त्याच्या मित्रांना समजताच त्यांनी धाव घेत अक्षयला सेवाग्राम येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत स्पॉट पंचनामा करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे बयाण नोंदविले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाच आरोपी हे अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेतले तर ऋषिकेश दिनेश बहेणवाल आणि नीलेश मनोहर पटेल यांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी मयूर गिरी याचा शोध पोलीस उपनिरीक्षक विजय चन्नोर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here