वर्धा : गुगल मॅपवरून सिमेंट कंपनीचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यावरून सिमेंट बॅगांची ऑर्डर देणे कंत्राटदाराला चांगलेच महागात पडले असून सिमेंट कंपनीचे बनावट पेज तयार करून कंत्राटदाराला तब्बल २ लाख ६५ हजारांनी गंडविल्याचा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी कंत्राटदाराने आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार मिरड पोलिसात दाखल केली असून पोलिसांनी अज्ञातादिरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
राकेश राजेश बोबडे रा. गिरड हा कंत्राटदार असून तो गुगल मॅपवर लेकेशन सर्च करीत असताना एका सिमेंट कंपनीचा मोबाईल क्रमांक मिळाला. कंत्राटदार राकेश याने मोबाईल क्रमांकावर संपर्क करून सिमेंटबद्दल संपूर्ण माहिती घेतली. भामट्याने कंपनीचे सगळे डाक्यूमेंट त्याच्या ई मेलवरही पाठविले. त्यामुळे राकेशला विश्वास बसल्याने सिमेंटचे कोटेशन अतिशय कमी दिसल्याने त्याने रजिस्ट्रेशन करून २ लाख ६४ हजार रुपये बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून ट्रान्सफर केले. राकेशने कंपनीच्या अधिकाऱ्याला सिमेंटचा ट्रक किती तारखेला येईल, अशी विचारणा केली असता ट्रक १४ मे रोजी दुपारी १ वाजेपर्यंत येणार असल्याचे सांगितले.
काही दिवसांनी पुन्हा माहिती घेतली असता त्यांनी तुमचा सिमॅटचा ट्रक निघाला आहे असे सांगितले. पण, ट्रक न आल्याने राकेशने सिमेंट कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक शोधून त्यावर संपर्क केला असता सिमेंट कंपनीच्या वर्धा जिल्ह्यातील डिलरचा क्रमांक त्यांनी दिला. त्यांच्याशी संपर्क केला असता कंपनीचे डाक्यूमेन्ट्स बरोबर आहे. पण, त्यातील अकाउंट नंबर कंपनीचा नसल्याचे त्यांनी सांगितले. राकेशने हिंगणघाट येथील बँकेत जात ज्या खात्यावर रक्कम पाठविली त्या खात्याची माहिती घेतली असता ते अकाउंट सिमेंट कंपनीच्या नावावर नसल्याचे समजले. अखेर राकेशला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट गिरड पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली.