वर्धा : बांधकाम साहित्याचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. पण, वाळूचे भाव मात्र वाढलेलेच आहेत. पंधरा दिवसांपूर्वी १३ ते १६ हजार रुपयांत चारशे फुट मिळणारी दाळू आता १५ ते १६ हजार रुपयात घ्यावी लागत आहे. आता वाळूघाट बंद झाल्याने वाळूच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे स्टील, सिमेंटचे दर कमी झाले तरीही इतर महागाईचा परिणाम आहे.
स्टील आणि सिमेंटच्या दरात थोडी घसरण झाली आहे. सिमेंटची बॅग ४०० रुपयांवर गेली होती, ती आता ३७० रुपयाला मिळत आहे. स्टीलचे दर प्रतिक्विंटल बाराशे रुपयांनी कमी झाले आहे. तरीही घरांचे दर जैसे थेच राहणार आहे. कारण मजुरी आणि वाळूचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. मागच्या महिन्यात स्टील, सिमेंटच्या दराने उच्चांक गाठला होता. यामुळे बऱ्याच लोकांचे घरांचे बांधकाम रखडले होते. इतकेच नाही तर घरकुलाची कामेही प्रभावित झाली होती. पण, आता काही प्रमाणात स्टील, सिमेंटचे दर कमी झाल्याने घर बांधकामाने जोर पकडल्याचे दिसत आहे. थांबलेली बरीच कामे आता मार्गी लावली जात आहे.