

वर्धा : तब्बल पाच तास विद्युत पुरवठा बंद राहिल्याने पोल्ट्री फार्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. अशातच पोल्ट्री फार्ममधील तब्बल १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. ही घटना देवळी तालुक्यातील मलातपूर येथे घडली असून, यामुळे शेतीला कुक्कुटपालनाची जोड देणाऱ्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी सागर पजगाडे यांनी शेतीला कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. त्यांनी मलातपूर येथे आठ हजार पक्ष्यांची क्षमता असलेले कुक्कुटपालन केंद्र उभारले आहे. त्यासाठी त्यांनी बँकचे १५ लाखांचे कर्जही घेतले आहे. कुक्कुटपालनाचा व्यवसाय जोमात येत नाहीच तो महावितरणकडून परिसरातील विद्युत पुरवठा काही कारणास्तव खंडित केला. तब्बल पाच तास विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने पोल्ट्री फर्ममधील तापमानात कमालीची वाढ झाली. याच वाढलेल्या तापमानाने पोल्ट्री फार्ममधील १ हजार ९७० कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामुळे सागर पजगाडे यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्ताला शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.