आर्वी : सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्याचा मृतदेह एका शेतातील विहिरीत पुरवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती बुधवार ३१ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उजेडात आली. मृतकाच्या शरीरावरील दागिने चोरुन गळा आवळून हत्या करीत मृतदेह विहिरीत फेकून दिल्याच्या घटनेने मात्र, आर्वी शहरात चांगलीच खळबळ उडाली. महेंद्र रामराव शिंगाणे (५९) रा. नेताजी वॉर्ड असे मृतकाचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी अक्षय रमेश सतपाळ (२३), शेख शाहरुख शेख रउफ (२८), विनोद दयाराम कुथे (४२), मोहम्मद जाफर मोहम्मद यासीन (२९) सर्व रा. आर्वी यांना मध्यरात्रीच्या सुमारास अटक केल्याची माहिती आहे.
मृतक महेंद्र हा कुणालाही न सांगता त्याच्या एम.एच. ३२ एक्यू. ७९९४ क्रमांकाच्या दुचाकीने घरातून बाहेर गेला होता. मात्र, तो परतलाच नाही. याबाबत पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपासाला गती दिली असता आरोपींसोबत मृतकाचा पैशाचा व्यवहार असल्याने आरोपींनी त्यांचे अपहरण केल्याची तक्रार मुलगा सागर शिंगाणे याने पोलिसात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी १ मे रोजी रात्रीच्या सुमारास अपहरणाचा गुन्हा दाखल करुन आरोपी अक्षय सतपाळ यास ताब्यात घेत त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने महेंद्रच्या शरीरावरील दागिने चोरण्याचा आम्ही कट रचला होता त्यानुसार त्याला वर्धा रोडवर असलेल्या स्मशानभूमी जवळील एका शेतात बोलाविले. तेथे महेंद्रचा दोराने गळा आवळून त्याची हत्या करीत पाच सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे २ गोफ, आणि रोख रक्कम काढून घेत त्याचा मृतदेह आणि दुचाकी विहिरीत पुरवून पुरावे नष्ट केल्याची माहिती पोलिसांना दिली.
आर्वी पोलिसांनी मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास अनिल अर्जुन ठाकरे यांचे शेत गाठून विहिरीत पुरलेली दुचाकी आणि मृतदेह विहिरीबाहेर काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिसांनी मध्यरात्रीच चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. या आरोपींना गुुरुवारी दुपारी आर्वीच्या न्यायालयात हजर केले असता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुखे यांच्या निर्देशात पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.