वर्धा : पोलिसात तक्रार का केली, या कारणातून वाद करीत नऊ युवकांनी व्यक्तीच्या घरात अनधिकृत प्रवेश करून, घरातील कपाटाच्या काचा फोडून कारच्या काचा फोडल्या, तसेच इतर साहित्याची नासधूस करून नुकसान केले. ही घटना २७ रोजी रात्रीच्या सुमारास हिंगणघाट शहरातील डांगरी वॉर्ड परिसरात घडली.
भोजराज जंगले याचा २५ मे रोजी वाढदिवस असल्याने, त्याने गणेश भांगे याच्याकडे पैशाची मागणी केली होती. याबाबतची तक्रार त्याने पोलिसात दिली होती. याचा राग मनात धरून आरोपी भोजराज जंगले, मोहन भुसारी, चिमा उर्फ अनिकेत, शाहरुख, समीर, वृषभ आझाद, मयूर टामटे, रोशन, शैलेश सर्व रा.हिंगणघाट यांनी गणेश भांगे याच्या घरावर हल्ला करून शिवीगाळ केली.
आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी दारावर लाथा मारून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. शिवाय घरातील कपाटाच्या काचा फोडल्या. तसेच घराच्या आवारात उभ्या असलेल्या एम, एच. 43 व्ही. 3396 क्रमांकाच्या कारच्या काचा फोडल्या. वीज मीटर तोडून नुकसान केले. शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर या प्रकरणी गणेश यांची पत्नी नैना भांगे यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.