

वर्धा : तापमानाने पुन्हा एकदा उसळी घेतली असून शनिवारी 14 मे रोजी कमाल तापमान तब्बल 46.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यावर्षीचे हे तापमान सर्वोच्च असून, या माध्यमातून तापमानवाढीचा एक नवा विक्रम नोंदविला गेला आहे. विदर्भात आज वर्ध्यांचे सर्वाधिक तापमान राहिले. प्रचंड उष्णता, उकाड्याने नागरिकांची चांगलीच होरपळ झाली. कामानिमित्त भरदुपारी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली. तापमानवाढीने नागरिकांच्या कामांचाही खोळंबा झाला. अनेक नागरिकांनी तापमानाचा चढता पारा पाहता घराबाहेर पडणे टाळले. ज्यांना बाहेर पडणे आवश्यक होते, त्यांनी चेहरा दुपट्टा, ओढणी, इतर कापडांनी झाकून बाहेर पाऊल ठेवले. त्यानंतरही दुपारच्या सुमारास जोरदार झळा सोसाव्या लागल्या.
आज अनेक ठिकाणी शीतपेयांच्या दुकानांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. उसाचा रस, मठा आदी शीतपेयांना अधिक मागणी राहिली. विक्रमी तापमानामुळे सायंकाळीही उष्ण हवा, उकाडा जाणवत होता. प्रचंड उष्णतामानामुळे पंखा, कुलरची हवाही पुरेशी ठरत नव्हती. शहरात काही ठिकाणीच पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था आहे. इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी, चौकांमध्ये पाण्याची व्यवस्था नाही. परिणामी, तहानलेल्या नागरिकांना पैसे देऊन बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागत होते. मात्र, सामान्य आणि गरजू माणसांना मात्र, तहान सहन करीत आपली कामे करावी लागत होती. येत्या काही दिवसांत पारा असाच चढता राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.