शासकीय परिचारिका अन्‌ डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यास दंडासह कारावास

वर्धा : कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपी भूपेश शिवणकर रा, नाचणगाव यास जिल्हा व सत्र न्यायालयाने कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ व्ही. पी. आदोणे यांनी शुक्रवारी दिला.

आरोपी भूपेश शिवणकर यास भादंविच्या कलम ३३२ अन्वये एक वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच भादंविच्या कलम कलम ३५३ अन्वये एक वर्षाचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. नाचणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ ऑक्टोबर २०१६ रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास रूपेश खांडेकर यास उपचारासाठी आणण्यात आले. याच वेळी आरोपी भूपेश शिवणकर व त्याच्या मित्रांनी त्याठिकाणी गोंधळ घालून उपचार होत नाही तर कशाला दवाखाना उघडला, बंद करून टाका, असे म्हणत रुग्णालयातील साहित्य फेकले. शिवाय प्लास्टिकच्या खुर्चीने फिर्यादी व त्यांच्या मदतनिसाला मारहाण केली. तसेच वैद्यकीय अधिकारी यांनाही शिवीगाळ केली.

याप्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रारीवरून भादंविच्या कलम ३५३, १४३, १४७, १६९, १८६, ३३२ सहकलम ३ सार्वजिनक संपत्ती नुकसान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयात एकूण नऊ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद, पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष गृहित धरून न्यायाधीश व्ही. पी. आदोणे यांनी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here