रोहना : नजीकच्या सायखेडा येथील एका शेतातील कांदा चाळीला आग लागली. ही घटना मंगळवारच्या मध्यरात्री घडली असून, शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. कृष्णकांत गणेश ठाकरे (रा. सायखेडा) यांची गावालगतच ओलिताची शेती आहे. शेतामध्ये कांदाचाळ असून, त्यामध्ये स्प्रिक्लरचे ६० पाईप, १६ पितळी नोझल, एक डिझेल इंजिन, २ फवारणीचे बॅटरी पंप, १०क्विंटल कांदा, १० क्विंटल लसून व शेतीचे अवजारे ठेवले होते. रात्रीच्या वेळी अचानक या कांदा चाळीला आग लागल्याचे सर्वच जळून खाक झाले.
ही आगपहाटे गावातील नागरिक चंद्रकांत बोबडे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा सुरू केला. गावातील नागरिकांसह शेत मालकालाही जागे केले. लागलीच सर्वानी शेताकडे धाव घेऊन शेतातील मोटारपंप सुरू केला व पाण्याने आग विझविली. यामध्ये शेतकऱ्याचे 3 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. या शेतकऱ्याचा नुकताच विवाह झाला असून, विवाहाचा खर्च भरून काढण्यासाठी धडपड सुरू होती. आता आगीत सर्वच राख झाल्याने दुष्काळात तेरावा महिनाच ठरला आहे.