वर्धा : 75 वर्षापुर्वी देश स्वतंत्र झाला. त्यावेळी प्रत्येक जण स्वातंत्र्यासाठी धडपडत होता. त्यावेळी जात पंथ असा विचार केल्या गेला नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने प्रत्येक जण राष्ट्रभक्तीच्या भावनेने लढत होता. कोरोना काळातही कोणीही जात, पंथ पाहिला नाही. प्रत्येकाने एकता आणि सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी जातपात विसरुन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री सूनील केदार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापण दिनानिमित्त जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन संबोधित केले. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर जिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलीदान देणा-या हुतात्म्यांना पालकमंत्र्यांनी अभिवादन केले. स्वातंत्र्य लढयात सहभागी झालेल्या शुरविरांनी कोणताही जातीभेद केला नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते एकदिलाने लढले. एकता आणि माणुकीच्या भरवश्यावरच देशात बंधुभावना कायम राहू शकते. प्रत्येकाने याच भावनेने सर्वसामान्यांसाठी काम करणे आवश्यक आहे. दोन वर्षापुर्वी जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा 163 कोटीचा होता आता, तो 225 कोटीचा झाला असून त्यात अजून आपण भर घालणार आहोत. गेल्या वर्षी 65 हजार शेतक-यांना पिककर्जाचा पुरवठा केला. यावर्षी आपण 1 हजार 170 कोटी रुपयांचे कर्जवाटप करतो आहोत, असे पालकमंत्री म्हणाले.