वडेनर : राष्ट्रीय महामार्गावर सध्या अपघात सत्र सुरू असून तीन दिवसांत तब्बल तीन भरधाव वाहने अनियंत्रित होत थेट रस्ता दुभाजकावर चढली. यामुळे या महामार्गावर वाहतूक नियंत्रण पथकाद्वारे विशेष मोहीम राबवून प्रत्येक वाहनचालकाकडून वेग मर्यादेची अंमलबजावणी करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
गुरुवार २१ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्गावरील घाटसावली शिवारात भरधाव असलेली एम. एच. २० बी. वाय. ३४५६ क्रमांकाची कार अनियंत्रित होत रस्ता दुभाजकावर चढली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शुक्रवारी ऑइलची वाहतूक करणारा भरधाव टँकर अनियंत्रित होत थेट रस्ता दुभाजकावर चढला. यात टँकर चालक थोडक्यात बचावला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास भरधाव ट्रक अनियंत्रित होत रस्त्याच्या कडेला उतरत थेट बांबूच्या झुडपात शिरला. या तिन्ही घटना एकाच जागेवर घडल्या हे विशेष.