आर्वी : 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम यांना शासकीय औषधाच्या गैरव्यवहार प्रकरणी 9 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी आज उपजिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिका शोभा राठोड यांना अटक करण्यात आली असून, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलीच्या अवैध गर्भपात प्रकरणी पोलिसांनी जेव्हा कदम हॉस्पिटलची झडती घेतली होती, त्यावेळेस तिथे मोठ्या प्रमाणावर शासकीय रुग्णालयात वापरल्या जाणारी इंजेक्शन्स व औषधाचा साठा सापडून आलेला होता. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र मुख्य प्रकरणात रेखा कदम व नीरज कदम यांना अटक झाली असल्यामुळे औषधाच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्यात आली व पोलिसांनी केलेल्या चौकशीत उपजिल्या रुग्णालय येथील औषधी साठा रजिस्टरमध्ये अनेक ठिकाणी खोडतोड केल्याचे आढळून आल्यामुळे वरिष्ठ परिचारिका शोभा राठोड यांना अटक करण्यात आली. यादरम्यान औषधाचा साठा सापडला तेव्हा तो कुठून प्राप्त केला असेल यासंबंधीची उलट-सुलट चर्चा होती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी ही औषधे उपजिल्हा रुग्णालयांमधील नाही, असे सांगितले होते.