
वर्धा : दुचाकीने जात असताना मागाहून भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकी चालकाला चिरडल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास दत्तपूर पासून गेलेल्या नागपूर ते नागपूर बायपास रस्त्यावर झाला. दीपक गौतम ताकसांडे (३७) रा. पोलीस वसाहत पिपरी मेघे असे मृतकाचे नाव आहे.
दीपक ताकसांडे हे २००४ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सहा महिन्यांपूर्वीच ते सैन्य दलातून सेवा निवृत्त झाले. ते एम.एच.३२ ए.बी. ४८९३ क्रमांकाच्या दुचाकीने पिपरी येथील पोलीस वसाहतीत असलेल्या त्यांच्या घरी जात असताना मागाहून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने ते ट्रकच्या चाकात आल्याने ट्रकने त्यांना काही अंतरावर चिरडत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रस्त्यावर पडून होता. याची माहिती सेवाग्राम पोलिसांना मिळताच पोलिसांनी अपघातस्थळ गाठून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. अपघातस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांनीही भेट दिली होती.
मृतक दीपक ताकसाडे यांच्या मागे पत्नी दोन मुलं असा आप्त परिवार आहे. १८ रोजी सोमवारी दुपारच्या सुमरास मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून अंत्यसंस्कार पार पडले. पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत असून ट्रकचालकाचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.