सेलू : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या विविधा इमारतीच्या हॉलमध्ये ठेवून असलेल्या महानेटच्या इंटरनेट सेवा केंद्राच्या 31 बॅटऱ्या (किंमत 3 लाख 63 हजार रुपये) अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवार 13 एप्रिलला उघडकीस आली सेलू व कारंजा तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना तसेच शासकीय स्वस्त धान्य दुकानांना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी सेलू येथील तहसील कार्यालय परिसरात विविधाच्या इमारतीत मागच्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये महानेटचे इंटरनेट सेवा केंद्र तयार करण्यात आले आहे.
इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी तेथे ऐंमरॉन कंपनीच्या 40 बॅटर्या होत्या. इंटरनेट सेवा पुरविण्याचे कामाला सुरुवात व्हायची होती. महानेट केंद्राचे काम पाहणारे कर्मचारी 8 एप्रिलला याठिकाणी आले असता तेथे बॅटर्या होत्या. पण, बुधवारी 13 एप्रिलला कर्मचारी हॉलमध्ये जाण्यासाठी गेले असता त्यांना दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आत प्रवेश करताच त्यांना बॅटर्यांची वायरिंग तुटलेली दिसून आली. बारकाईने बघितले असता 40 बॅटऱ्यापैकी 31 बॅटर्या चोरीला गेल्याचे दिसून आले. त्याची अंदाजे किंमत 3 लाख 63 हजार असल्याचे सांगण्यात येते. याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी वर्धा येथील प्रमुखाला दिली. त्यांनी सेलू येथे येऊन याची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.