

वर्धा : पेन्शन प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुण्पट मिळेल, असे आमिष देत व्यक्तीची एक लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना गुरुकृपा कॉलनी परिसरात १२ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वामन लहानूजी घोडे यांना पराग शेषराव राऊत, रा. नागपूर याने पेन्शन प्लॅनमध्ये १ लाख रुपये गुंतविल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्यात २००० रुपये मिळेल, असे आमिष दाखवून त्यांच्याकडील फॉर्मवर स्वाक्षरी घेतली, तसेच वामन यांनी त्याला बँकेचे धनादेश दिले. आरोपी पराग याने धनादेश बँकेत वटवून १ लाख रुपये काढले आणि कोलकता येथील एका कंपनीत तुमचे पैसे गुंतविल्याचे सांगून पीडीएफ फाईल पाठविली. मात्र, ती फाईल चुकीची असल्याने वामन यांनी आरोपी पराग याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वामन घोडे यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.