वर्धा : काकूला घेऊन दुचाकीवर जात असलेल्या पुतण्याच्या दुचाकीला कार चालकाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात काकू जागीच ठार झाली तर पुतण्या गंभीर जखमी झाला. ही घटना 9 एप्रिल रोजी 10.30 वाजता मौजा येरणगाव शिवारात घडली. फिर्यादी विकास दत्तुजी मोहुरले (वय 41) यांची मोठी काकू शांताबाई लक्ष्मण मोहुरले (वय 70) व पुतण्या लोकेश किसन मोहुरले रा. सोनबर्डी जि. यवतमाळ हे दुचाकी क्र.एम.एच. 29 ने सिरसगाव ते वडनेर रस्त्याने जात असताना विरुद्ध दिशेने येणारी कार क्र.एम.एच. 04 ई.एच. 9192 च्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात शांताबाई लक्ष्मण मोहुरले (वय 70) या जागीच ठार झाल्या. तर लोकेश मोहुरले हा जखमी झाला असून, त्याच्यावर वडनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विकास मोहुरले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इनोवा कार क्र. एम.एच. 04 ई.एच. 9192 च्या चालकाविरुद्ध वडनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.