सिंदी रेल्वे : थोर महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतांनी आनंदाच्या भरात इतरांना त्रास होणार नाही इतर समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाही दोन समाजात तेढ निर्माण होवुन शांतता भंग होणार नाही यांची आयोजकानी विशेष खबरदारी घ्यावी अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. अशी सुचना मंगळवारी (ता. ६) ला पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांनी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाजी पार्कवरील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदेवरील भोंग्याबाबत नाराजी व्यक्त करीत विरोध म्हणून मशीदीसमोर हनुमान चालीसा जोरदार आवाजात लावण्याची भाषा केल्यांने पोलिस विभागा तर्फे विशेष खबरदारी घेतली जात आहे. दोन वर्षाच्या सार्वजनिक कार्यक्रमावरील बंदी नंतर पहील्यांदा होत असलेल्या रविवारी( ता.१०) श्रीराम जयंती आणि गुरुवारी(ता.१४) डाॅ. आंबेडकर जयंती निमित्याने मंगळवारी(ता.६) पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची सभा घेण्यात आली.
यावेळी जयंती साजरी करणारे मिरवणूक वगैरे आयोजित करणाऱ्या मंडळ, संघटना आदीच्या प्रमुखाना आणि सभासदाना बोलावुन रितसर सुचना आणि खबरदारीच्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले शिवाय त्यांचा अडीअडचणी जाणुन घेण्यात आल्या. यावेळी पार पडलेल्या बैठकीला शांतता समितीचे पदाधिकारी सभासद आशिष देवतळे, अमोल सोनटक्के, ओमप्रकाश राठी, मोहन सुरकार, बबलू खान, गुड्डू क्युरेशी, रवी राणा, जनक पालिवाल, मनोज पेटकर तसेच बजरंग दलचे शहर प्रमुख सागर बाबरे, राहुल घोडे, प्रमोद बाकडे आदीची प्रमुख उपस्थीती होती.