सिंदी रेल्वे : अतिरिक्त यांत्रिकीकरणामुळे जमिनीच्या आतील शिरा बंद होऊन जमिनीची पाणी मुरण्याची शक्ती कमी होते त्यामुळे पाणी वाहून जमिनीची धूप होते ही धूप थांबविण्या करीता शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर या वर्षांपासून शेतकऱयांनी करावा तसेच या वर्षात प्रत्येक शेतकऱयांनी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.विद्या मानकर यांनी सर्व शेतकऱ्यांना केला.
त्या येथे तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा,आत्मा आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत गुरुवारी (ता.७) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात परिसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षणा अंतर्गत मार्गदर्शन करताना बोलत होत्या. सदर प्रशिक्षणाचा मुख्य विषय शून्य मशागत तंत्रज्ञान व रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करण्याबाबत होता. या तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन ट्रोपिकल इंडिया लिमिटेडचे अमोल गाहूकर, यांनी जमीन तयार करने, पेरणीच्या पद्धती, विविध पिकाचे वाण इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रगतशील शेतकरी संजय लांबट यांनी रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड व शून्य मशागत तंत्रज्ञान बाबत आपले अनुभव कथन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निरंजन वऱ्हाडे, यांनी शून्य मशागत तंत्रज्ञान विडिओ व छायाचत्राद्वारे शेतकऱयांना समजून सांगितले, आत्मा वर्धा मार्फत 60 टक्के अनुदानावर रुंद सरी वरंबा यंत्र उपलब्ध असून त्या करीता शेतकरी गटांनी अर्ज करावा असे आवाहन केले. सिंदी रेल्वे मंडळ कृषी अधिकारी, रविंद्र राऊत यांनी कृषी विभागाच्या विविध योजना बाबत माहिती दिली पोकरा योजनेचे प्रशांत साठे, यांनी पोकरा योजने बाबत माहिती दिली आयोजित कार्यक्रमाला सेलू, सिंदी मंडळातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिंदी मंडल कृषी कार्यालयातील पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.