
वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ उपलब्ध होऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित राहिले पाहिजे. यासाठी अन्नसुरक्षा व मानके अधिनियम अमलात आला असून, जिल्हयात या अधिनियमाची कडक अंमजबजावणी करण्यात येत आहे. अधिनियमाचे उल्लंघन करणा-याविरुध्द गेल्या वर्षभरात मोठया प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. अधिनियमांतर्गत गठीत करण्यात आलेल्या समितीचा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आढावा घेतला.
बैठकीला अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक संचालक नि. दी. मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत विधाते, जिल्हा उद्योग केंदाच्या व्यवस्थापक अश्विनी कोकाटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण वेदपाठक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते. अधिनिमांतर्गत ज्या ठिकाणी अन्नपदार्थांची विक्री, निर्मिती, वितरण केले जाते. अशा आस्थापनांची नोंदणी होणे आवश्यक आहे. अन्नपदार्थांची गुणवत्ता राखण्यासाठी विभागांतर्गत नमुने घेऊन त्याच्या तपासण्या केल्या जातात. नमुने अप्रमाणित असल्यास संबंधितांवर कायदयातंर्गत कारवाई केली जाते. जिल्हाधिका-यांनी गेल्या वर्षभरात याबाबत केलेल्या कारवाईचा आढावा घेतला.