वर्धा : भूगाव येथील उत्तम गाल्वा कंपनीत गेल्या अनेक वर्षांपासुन पवनार येथील धाम नदीतून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, गावाच्या विकासासाठी कोणतीही मदत आजपर्यंत करण्यात आली नसल्याने आता नव्याने होणार्या नोकरभरतीत पवनार येथील शिक्षितांना प्राधान्य देण्यात यावे, या मागणीचे निवेदन पवनारचे माजी सरपंच अजय गांडोळे यांच्या नेतृत्वात उत्तम गल्वाच्या स्थानिक प्रशासनाला देण्यात आले.
भुगाव येथे लॉयड् कंपनी नावाने स्थापना झाल्यापासून कंपनीसाठी आवश्यक तो पाणी पुरवठा पवनार येथील धाम नदीवरून करण्यात येत आहे. 30 वर्षांपासून कंपनीने धाम नदीचे पाणीच वापरले जात आहे मात्र, येथील बेरोजकांना नोकरीची संधी दिली नाही वा सामाजिक दायित्व निधीतून गावाचा विकास केला नाही. आता कंपनीत नव्याने नोकर भरती सुरू झाली असल्याने त्यात पवनार येथील शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर नोकरी देण्यात यावी अन्यथा गावाकरी कंपनीचा पाणी पुरवठा बंद करु, असा इशाराही यावेळी देण्यात आला. कंपनीतर्फे शर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे गांडोळे यांनी सांगितले. यावेळी अंबादास वाघमारे, छत्रपती पाल, राजकुमार हुलके, प्रणय वाघमारे, चंद्रकांत भट आदींची उपस्थिती होती.