वर्धा : तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतीळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील तळेगावलगतच्या सत्याग्रही घाटासमोर शेगाव येथून भंडा-याला कारने जात असलेल्या कुटुंबाला लुटारूंनी कार पंक्चर करुन थांबविले व जबर मारहाण करीत सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज लुटला. मंगळवारी 5 एप्रिलला मध्यरात्रीनंतर 3 दरम्यान ही भयावह घटना घडली.
उमेश भय्यालाल उरकुडे रा. भंडारा रोड, सुभाष वॉर्ड, वरठी, ता. मोहाडी जि. भंडारा हे पत्नी चंदा उरकुडे, मामी अलका हरसे, वहिनी रेवता उरकुडे, भाचा वैभव कुरवे तसेच चालक विशाल नेवारे हे एम.एच. ३६ एजी. ६६३१ क्रमांकाच्या कारने शेगाव येथे नातेवाईकाच्या मयतीला गेले होते. अंत्यविधी आटोपून संपूर्ण कुटुंब मंगळवारी रात्रीच्या सुमारास शेगावहून भंडाऱ्याला जाण्यासाठी निघाले. मध्यरात्रीनंतर ३ वाजताच्या सुमारास अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटाच्या समोर अचानक कारचा समोरील टायर फुटल्याचा आवाज आल्याने कार रस्त्याकडेला थांबविली.
चालक विशाल आणि वैभव कारखाली उतरले आणि स्टेपनी काढण्यासाठी कारची डिक्की उघडण्यासाठी मागे गेले असता सुमारे ३० ते ३५ वयोगटातील चार युवक हातात लाठ्या-काठ्या घेऊन धावत येताना दिसले. त्यांनी अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हल्ला चढवून दोन्ही हातांवर उजव्या पायाच्या गुडघ्याखाली तसेच पाठीवर लाठीने मारहाण करून जखमी केले. कारमधील महिलांना दागिन्यांची मागणी करून शिवीगाळ करीत मारहाण केली. महिलांसह पुरुषांच्या अंगावरील एकूण ५५ ग्रॅम सोने, १८ ग्रॅम चांदी आणि ११ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेत पळ काढला.